Posts Tagged 'Life'

६०७) आज १२ मे २०१९ , रविवार, मातृदिन

६०७) आज १२ मे २०१९ , रविवार, मातृदिन

आज जागतिक मातृदिन …. सर्वांना मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …. !!

Happy Mothers Day…!!

खरेतर आपल्या भारतीयांसाठी रोजच मातृदिन असतो. वर्षातून मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जागतिक मातृदिन साजरा केला जातो म्हणून आपणही हा दिवस social media मध्ये साजरा करतो. पण आईचे उपकार असा एखादा दिवस साजरा करून फिटू शकणार नाहीत ह्याची जाणीव मात्र बाळगणे गरजेचे आहे. असो .

मातृदिनाच्या दिवशी माझ्या आईच्या काही आठवणी आणि तिचे माझ्या आयुष्यातील तीचे स्थान ह्या संबंधी हा लेख आणि कविता सादर करत आहे . मित्रानो तुम्ही पण आईबद्दलच्या आठवणी share कराव्यात अशी माझी नम्र विनंती .

माझ्या आईचा जन्म १९-०९-१९१९ आणि मृत्यू २६-१०-२००४

माझ्या आईच्या आयुष्याचे तीन टप्पे होते. लग्नापर्यंत तिचे बालपण सुखवस्तू घरात गेले. लग्नानंतर ते वडिलांच्या मृत्यूपर्यंत (२१-०८-१९६९) आणि त्यानंतर तिच्या मृत्यूपर्यंत (२६-१०-२००४)

आई त्याकाळी सातवी पर्यंत शिकली होती. तिला शिक्षिका म्हणून नोकरी करायची होती. पण लहान वयात लग्न झाल्यामुळे – करून दिल्यामुळे तिची हि इच्छा पूर्ण झाली नाही. तिला इंग्लिश समजत असे. ती सोपे इंग्लिश वाचूही शकत असे. ती इंग्लिशमध्ये सही करत असे. तिचे वाचन अफाट होते.

पण लग्न झाल्यामुळे ती संसारात गुरफटली. त्यानंतर वडिलांचे आजारपण (मधुमेह) काढण्यात, पै पाहुण्याचे करण्यात तिची उमेदीची वर्षे खर्ची पडली. वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या कलागुणांना वाव मिळाला. तिने व तिच्या मैत्रिणीनी महिला मंडळाची स्थापना केली. (१९७०) बायकांना घराबाहेर पडण्यासाठी व्यासपीठ मिळाले. महिला मंडळाची सेक्रेटरी म्हणून अनेक वर्षे काम सांभाळले. मंडळासाठी अनेक बक्षिसे मिळविली. (गीता पठण, गीतेवर निबंध लिहिणे, कथा कथन) तिला गीतेचे अठरा अध्याय पाठ होते. गीतेवरील निबंध, मंडळातील उच्च शिक्षित सभासद लिहून देत असत. पण २०-२५ पानांचा निबंध परीक्षकाच्या समोर २ तासात न बघता सुवाच्य अक्षरात लिहावा लागे. कथाकथनाची वेळ सुद्धा ४० मिनिटे असे. त्यामुळे दीर्घ कथा सांगावी लागे. मंडळाची दर वर्षी सहल जात असे. आम्हा मुलांबरोबर तिचा भारतभर प्रवास झाला. हा कालखंड खऱ्या अर्थाने तिने उपभोगला. ह्याच काळात आम्हा भावंडांची लग्ने झाली. तिला नातवंडांचे सुख मिळाले.

तिने आपल्या सुनांना खऱ्या अर्थाने मुलींसारखे वागविले. दुसऱ्या माणसाच्या गुणांबद्दलच ती बोलत असे. वाईट वागणाऱ्या माणसाबरोबरही ती चांगलीच वागत असे. तिची निर्णय क्षमता थोडी डळमळीत होती. म्हातारपणाच्या चिंतेमुळे ती माणसांच्यात भावनिक गुंतवणूक करत असे. पण शेवटी तिचा काही प्रमाणात अपेक्षाभंग झाला. हेच दु:ख बरोबर घेऊन तिने जग सोडले.

आईला समजून घेण्याचा प्रयत्न मी पूर्वीच केला आहे. माझे आत्मचरित्र त्या लेखाशिवाय पूर्ण झाले नसते.

आईची अनेक रूपे असतात, काही आपल्याला कळतात तर काही कळत नाहीत. मला उमजलेली आईची रूपे मातृदिना निमित्त आज सादर करत आहे .

माझ्या बाललीला बघणारी….

माझे लाड करणारी…
माझी आवड -निवड कळणारी …
मला शिस्त लावणारी …
मला शिक्षा करणारी …

मला चांगल्या – वाईटाची समज देणारी
माझे कौतुक करणारी …..
माझ्या पाठीवर मायेचा हात फिरवणारी ………
माझा अभ्यास घेणारी ……

माझ्या आवडी -निवडी जपणारी …..
माझ्या छंदाला प्रोत्साहन देणारी …
मला चांगले खाऊ – पिऊ घालणारी ………….
माझ्यातले गुण आणि अवगुण जाणणारी …..

मला दुर्गुणावर मात करायला शिकवणारी …….
मला ध्येय ठरवायला मदत करणारी …..
मला ध्येयाची वेळोवेळी आठवण करून देणारी ………..
स्वत:च्या वागणुकीतून मला आयुष्याचे धडे देणारी ……………

मला अलिप्तता शिकवणारी ………
माझ्या विजयात सहभागी होणारी ………..
माझ्या पराभवात साथ देणारी ……………..
माझ्या शिक्षणावर आणि अनुभवावर विश्वास ठेवणारी ….
मला समजून घेणारी …

मला समजावणारी …
माझी चूक पदरात घालणारी …
माझी चूक दाखवून देणारी …
माझ्या वतीने वडिलांकडे वकिली करणारी …

माझी कान उघडणी करणारी …
माझी पाठ थोपटणारी ….
माझ्यावर प्रेम करणारी …….
माझी वाट बघणारी ….

माझ्यावर जीव टाकणारी ….
मला कोठे थांबावे हे सांगणारी ….

जगातील सर्व मातांना माझा नमस्कार.

सुधीर वैद्य

१२-०५-२०१९

Aai 2 5-7

 

Advertisements

Archives

July 2019
M T W T F S S
« Jun    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements