Archive Page 3

५७२) माझा आवडता हिरो……

Dada-21082009380-002

५७२) माझा आवडता हिरो……

तुमचा आवडता हिरो कोण ? मला कल्पना आहे कि हा प्रश्न वाचून तुम्ही चक्रावला असाल? कारण मी सहसा सिनेमा – हिरो वगैरे संदर्भात पोस्ट अपलोड करत नाही.

बर ते जाऊदे. तुम्ही उत्तर तर द्या ? मला कल्पना आहे कि तुम्ही मनातल्या मनात कोणाचे नाव घेऊ असा विचार करत असाल. माझे मात्र उत्तर तयार आहे आणि तुम्ही जर नीट विचार केलात तर तुम्हाला कळेल कि सर्वांचे हेच उत्तर अपेक्षित आहे. My DAD is  My HERO.

अर्थात काही सन्मानीय अपवाद असू शकतात. पण अपवादामुळेच तर नियम सिद्ध होतो ना? असो . प्रस्तावना फारच लांबली. 🙂

आज पितृदिन. रविवार, १७-०६-२०१८  

दिवस किती बदललेत नाही ? आज पितृदिन साजरा करण्यासाठी जगभर दिवस मुक्रर करण्यात आला आहे. अर्थात ह्या तारखा देशानुसार बदलतात. पण बहुसंख्य देश (भारतासकट ) जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी पितृदिन साजरा करतात . खरेतर आपण जे आयुष्य उपभोगतोय ते त्यांच्यामुळेच. एकदिवस पितृदिन साजरा करून आपण कर्तव्य पार पाडले असे म्हणू शकतो का?

१९५७ साली (माझे वय ६ वर्षे)  आम्ही सर्व भावंडे पुण्याला काकांकडे राहत होतो. कारण माझ्या दादांना टीबी  झाला होता आणि त्यामुळे ते तळेगावच्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते. एक दिवस मोठ्या माणसांच्या दबक्या आवाजातील बोलणे मला ऐकू आले. माझे दादा जरी बरे झाले तरी फार वर्षे जगणार नाहीत. हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या चेहऱ्यावरील हसू मावळले.

मी एकलकोंडा झालो, मला नेमके काय होते आहे हे मी सांगू शकत नव्हतो आणि लोकांना ते समजत नव्हते.  मला अंधार आवडू लागला. मी अंधाऱ्या  जागी लपून बसू लागलो. मला आजही अंधार खूप आवडतो. अंधारात मी स्वत:शी संवाद साधतो, माझा भूतकाळ आठवतो, दादांबरोबराचे सोनेरी दिवस मनात गोळा  करतो, मला ज्यांनी त्रास दिला त्यांचे स्मरण करतो (ज्यांच्या मुळे माझी जगण्याची उर्मी कायम राहते)

उजेडात असणारी सोबत हि नेमकी किती खरी आणि किती खोटी हा प्रश्न उरतोच. अंधारात सोबत नसते पण आपले मन आपल्याला कधीच सोडून जात नाही.

कालांतराने दादा बरे झाले. मी त्यांची खूप सेवा केली. पण शेवटी त्यांच्या वयाच्या ५८ व्या वर्षी २१-०८-१९६९ साली  ते देवाघरी गेले. (हे लिहिताना माझे डोळे कधी पाणावले हे मला कळलेच नाही.) आजही ४९ वर्षांनंतर सुद्धा त्यांची आठवण माझ्या मनात ताजी आहे. असो .

मला वडिलांचा सहवास फार कमी मिळाला. मधुमेहाने बरीच वर्षे आजारी असल्यामुळे त्यांच्या आयुष्याची दोरी कमजोर होती. त्यांच्या मृत्युच्या छायेत माझे बालपण गेले. पण एवढ्या कमी वर्षात त्यांनी माझ्यावर जे संस्कार केले, ती शिदोरी मला आजपर्यंत पुरली आहे. आजही अडचणी आल्या की ध्यान करून मी वडिलांची आठवण करतो आणि मी जेव्हा डोळे उघडतो तेव्हा मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले  असते. त्यांच्या death anniversary च्या दिवशी मी ध्यान करून त्यांच्या सहवासातील दिवस आठवतो. मनाची ताकद एवढी मोठी आहे की अवघ्या १५ मिनिटात मी बालपणातल्या १०-१२ वर्षांना स्पर्श करून  येतो.

प्राप्त आर्थिक परिस्थितीत त्यांनी आम्हा भावंडांचे लाड केले. चांगल्या – वाईटाची ओळख करून दिली. माणूस कसा ओळखावा ह्याबद्दल त्यांचे आडाखे होते.  त्यांच्या कडून मी खूप काही शिकलो. माझे लाड त्यांनी जरा जास्त केले कारण मी त्यांचा जिवलग मित्र होतो. त्यांची सेवा करत होतो. ओषध देणे – आणणे – इन्सुलिनचे injection देणे हि कामे मी ८ वर्षापासून केली.  त्यांनी मला दिलेले पेन मी अनेक वर्षे वापरले व आजही त्यांची आठवण म्हणून जपून ठेवले आहे. तीच गोष्ट घडाळ्याची.

५ वीत असताना मला ट्रीपला  पाठवा म्हणून मी खूप हट्ट केला व त्याबद्दल ११ वी पास होईपर्यंत ट्रीपला जाणार नाही असे वचन दिले. ते वचन मी पाळले.

बाबा म्हटले कि आठवते ती त्यांची शिस्त, शिक्षा, कोणत्याही आर्थिक मागणीला प्रथम नकार. माझे दादा ही ह्याला अपवाद नव्हते. पण गमंत म्हणजे मी कधीच त्यांच्या वागणुकीबद्दल बद्दल निष्कर्ष काढले नाहीत. त्यांच्या वागणुकीचे मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे त्यांचे वागणे मला कधीच खटकले नाही.

आता वडिलांची महती लगेच कळण्याचे दिवस संपले आहेत. जेव्हा आपल्या मुलांना मुले होतात आणि मुलांना सांभाळणे त्यांना  कठीण होते, तेव्हा आपल्या मुलांना वडिलांची (आपली) महती कळते.

माझे संकेत स्थळ दादांच्या स्मृतीला अर्पण केले आहे.  ‘माझे वडील’ हा लेख माझ्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

डॉ. सलील कुलकर्णींची जेव्हा दोन गाणी कानावर पडतात तेव्हा मला प्रकर्षाने वडिलांची आठवण येते. (दूर देशी गेला बाबा आणि दमलेल्या बाबाची कहाणी)

खरेतर मी त्यांना विसरलोच  नाहीये. I really miss my father. 😦 मी  त्यांना  ३१-१२-२००९ रोजी लिहिलेले  पत्रही माझ्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

आमचा उत्कर्ष बघायला आज तुम्ही हवे होतात. तुमच्याशी खूप खूप गप्पा मारायच्या होत्या. पण जमलेच नाही. आपले एकमेकांबद्दलचे  प्रेम अव्यक्त होते. मी तुम्हाला भेटण्याची आतुरतेने वाट बघत आहे. बघूया देवाच्या मनात काय आहे ?
सुधीर वैद्य

१७-०६-२०१८

Advertisements

Archives

July 2018
M T W T F S S
« May    
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements