५९०) बुद्धिबळ आणि आयुष्य 

590) Chess and Life
५९०) बुद्धिबळ आणि आयुष्य 
लिखाणासाठी हा विषय सुचण्याचे कारण म्हणजे माझा  नातू (इयत्ता ४ थी ) शाळेतील १२ वर्षाखालील गटातील चेस टूर्नामेंट जिंकला व आता तो आंतर शालेय टूर्नामेंट मध्ये शाळेचे प्रतिनिधित्व करणार आहे.
बुद्धिबळ हा माझा खूप आवडता खेळ आहे. लहानपणी आमच्या वाडीत मी लहान मुलांच्यात चॅम्पियन होतो आणि माझा मोठा भाऊ मोठ्या मुलांच्यात चॅम्पियन होता. काळाच्या ओघात परिस्थितीमुळे माझे अनेक मैदानी आणि बैठे खेळ  बंद झाले.
माझा शेवटचा बुद्धीबळाचा डाव आजही माझ्या स्मरणात आहे. शाळेला सुटी होती. मी आणि माझा मित्र बुद्धीबळाचा डाव मांडून अंगणात बसलो होतो. वडिलांची तब्बेत बरी नव्हती. नातेवाईक भेटायला येत होते. आपापसात काही बाही कुजबुजत होते. काही शब्द कानावर पडत होते. खेळण्यातील लक्ष उडाले होते. कान देऊन ऐकता ऐकता अनेक गोष्टी कळत होत्या. मेंदू बधिर होत होता. मी वेड्यासारख्या  मूव्ह करत होतो. माझा मित्र सुद्धा हे बघून बुचकळ्यात पडला होता. एक दोनदा त्याने मला सांगितले सुद्धा. परंतु माझेच चित्त थाऱ्यावर नव्हते. जिंकत आणलेला डाव बरोबरीत संपला. मित्राला खूप आनंद झाला.
त्यानंतर फारसे बुद्धिबळाचे डाव खेळलेले  मला आठवत नाहीत कारण बुद्धिबळाचा पुढील डाव नशिबाबरोबर सुरु झाला. लोकांच्या त्या कुजबुजीतून एक गोष्ट मला कळली  होती कि माझे वडील आताच्या आजारातून बरे झाले, तरी थोड्याच वर्षाचे सोबती आहेत. माझ्या पायाखालील जमीनच सरकली.
नशीब मला बजावीत होते कि तू काय माझ्या बरोबर बुद्धिबळ खेळणार? तू तर एक प्यादे आहेस. हे नाकबूल करण्याचा प्रश्नच नव्हता. वडिलांचे छत्र हरपणार म्हणजे माझ्या नशिबाची ताकद फारशी नाही हे  न कळण्या एव्हडा मी काही ढ नव्हतो.
त्या क्षणी  आयुष्यात खचून जाऊन काहीच होणार नव्हते. मग नशिबाबरोबर रोजच डाव रंगू लागला. हरत होतो, मनाने खचत होतो, तसाच खेळत होतो.  पण त्याच वेळी मन मरत होते, पण त्याचवेळी खंबीर सुद्धा होत होते. दिवसामागून दिवस सरत  होते. ह्या टप्प्यावर आयुष्यात कोणते ध्येय गाठता येईल हा विचार सुरु झाला. नशिबाची साथ किती मिळेल  ह्याचा फैसला झालाच होता. पुरेशी बुद्धिमत्ता देवाने दिली होती. त्यामुळे अपार परिश्रम करून ध्येय गाठावे लागणार होते. अश्या विचित्र परिस्थितीमुळे जीवन जगावे कसे? हे तत्वज्ञान कोणत्याही गुरुकडे न जाता सहज शिकत गेलो.
लोकांशी – नातेवाईकांशी वागताना बुद्धिबळातील डावपेच मदतीला येत होते. बुद्धिबळातील सोंगट्यांप्रमाणेच माणसे सुद्धा वागत होती. कोणी हत्तीसारखे सरळ मार्गी, कोणी उंटासारखे तिरके, कोणी जन्मजात वजीर असल्यासारखे, किंमत नसलेली queen आणि बरिचशी प्यादी. परिस्थितीने गांजलेली व नाकासमोर मार्गक्रमण करणारी. कालांतराने वडील वारले. मी त्यांची खूप सेवा केली. त्यांनी प्रत्यक्ष न शिकवता, त्यांचा वागणुकीच्या निरीक्षणातून मी खूप काही अनेक गोष्टी शिकलो.
वडिलांच्या जाण्यामुळे डोक्यावरील मोठे टेन्शन दूर झाले होते कि नवीन तयार झाले होते हे माहित नाही. मी सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. मला खूप खूप शिकायचे  होते. खूप चांगला माणूस व्हायचे होते. एक एक पाऊल  टाकत शेवटी माझ्या प्याद्याचा वजीर झाला, पण पाय मात्र नेहमीच प्याद्याचे राहिले. नशिबाने मला खूप खेळविले होते. खूप कंटाळा आला. आयुष्यात झगडता झगडता विजयाचा सुद्धा आनंद होत नव्हता, कारण काही बाबतीत मला नशिबाने पूर्णपणे हरविलेच होते. त्यातून सुद्धा तोडगा काढून मी डाव बरोबरीत सोडविला.
सांगता येणारे दु:ख चांगले असते. अर्थात दु:ख दुसऱ्याला सांगून सुद्धा उपयोग असतोच असे नाही, कारण प्रत्येकालाच काहींना काही दु:ख  असते. दोन दु:खांची तुलना होऊ शकत नाही.
लोकांच्या वागणुकीचे निरीक्षण करता करता, मनाविरुद्ध स्वभावात खूप फरक पडला. खूप प्रयत्न करून सुद्धा थोडा कडवटपणा मनात झिरपलाच. समाजात वावरताना नकळतपणे बुद्धिबळाचे  डावपेच वागण्यात – बोलण्यात डोकावू लागले. माझे लॉजिकल – प्रॅक्टिकल वागणे अनेक लोकांना बुचकळ्यात टाकत होते. हे काही मी मुद्दाम करत नव्हतो. नकळतपणे नशिबाबरोबर बुद्धिबळ खेळण्याचा तो परिणाम होता.  मी मात्र सरळ मार्गी लोकांबरोबर हत्तीसारखा सरळ, तर खडूस लोकांबरोबर उंटासारखा तिरका वागत होतो. माझ्या खेळात Queen ला मात्र मी भाव दिला, अगदी मनापासून. वजीर झालो तरी ते मोठेपण वागणुकीत दिसणार नाही ह्याची खबरदारी घेतली. माझे पाय जमिनीवर कसे राहतील हे बघितले.
अनेकांनी माझ्या विषयी गैरसमज करून घेतला. पण मी डगमगलो नाही. माझे वागणे माझ्या साठी बरोबर होते, त्यामुळे कोणाचेही नुकसान होत नव्हते. कालांतराने माझी खरी ओळख माझ्या वागण्यातुन जेव्हा उलगडत गेली, तेव्हा हे गैरसमज कमी होत  गेले. समाजात राहूनसुद्धा मी मात्र नेहमीच समाजापासून दोन हात लांब राहिलो आणि कदाचित त्यामुळेच सुखी झालो. इतरांकडून फार अपेक्षा ठेवल्या नाहीत.
आयुष्यात कर्तव्य मात्र माझी पहिली प्रायॉरीटी राहिली. त्यामुळे कोणीच मला सरळ सरळ दोष देऊ शकले नाही. काही लोकांना तर ह्याच गोष्टीचे वैषम्य वाटू लागले कि मी चुकत कसा नाही?. थोडक्यात म्हणजे मी यांत्रिकपणे मूव्ह करत होतो. लहानपणच्या बुद्धिबळाचा परिणाम, दुसरे काय?
अजूनही नशिबाबरोबर बुद्धिबळाचा डाव चालूच आहे आणि तो तसाच चालू राहणार आहे ह्याची मला खात्री आहे. खरेतर आता ह्या खेळाची एव्हडी सवय झाली आहे कि, नाही खेळलो तर मलाच चुकल्या चुकल्या सारखे होईल.
मित्रांनो, तुम्ही कधी  बुद्धिबळ खेळले आहे का?  नकळतपणे नशिबाबरोबर प्रत्येकालाच खेळावे लागते. फरक इतकाच कि हा खेळ काही लोकांना कळतो तर  काहींना कळत नाही.
मित्रांनो, तुमचे अनुभव वाचायला मला आवडतील.
सुधीर वैद्य 
२४-०८-२०१८
Advertisements

0 Responses to “५९०) बुद्धिबळ आणि आयुष्य ”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

August 2018
M T W T F S S
« Jul   Sep »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: