३६६) स्पंदने आणि कवडसे – भाग ६

289) Spandane & Kavadase
३६६) स्पंदने आणि कवडसे – भाग ६

स्पंदने म्हणजे vibrations, मनातील कंपने. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. काही विचार मनात घर करतात. वाचताना – दुसऱ्याशी  बोलताना हि विचार धारा सुरु होते आणि काही काळ मनात हि विचारांची कंपने जाणवत राहतात. काही वेळा हि मनातील विचारांची कंपने उन्हाच्या कवडश्यासारखी शब्दरूप धारण करतात. अशीच काही मनातील विचारांची कंपने आणि कवडसे भाग ६ आपल्या समोर सादर करत आहे.
————————————————————————————

माणूस आणि देव:
आज सकाळी फिरून येताना एका गणपतीच्या मूर्तीच्या कारखान्यात डोकावलो होतो. प्रथम मी सर्व मूर्ती डोळे भरून पाहिल्या. गणरायाला मनोमन वंदन केले. प्रत्येक मूर्तीत विविधता होती. देवाने माणसाला घडविले आणि आता माणूस देवाला आपल्या मनाप्रमाणे घडवत होता.
————————-
प्रसन्न सकाळ :
रात्री ३ वाजल्यापासून पाऊस पडत होता. सकाळी थांबला. मी नेहमी सारखा फिरायला बाहेर पडलो. छत्री बाळगली होती. 🙂 रस्ते ओले होते. रस्त्यावर पाण्याची तळी झाली होती. आकाश मात्र कालचे विसरून, मी त्या गावचा नाहीच असे दाखवत कोवळी उन्हे घेऊन दिवसाच्या स्वागताला आले होते. आकाश उजळून निघत होते. मी ते दृश्य डोळ्यात साठवत होतो.

तेव्हड्यात पत्नीने विचारले की Mobile आहे ना, मग फोटो का काढत नाही? ती प्रेमाने म्हणत होती की उपरोधिकपणे हे ठरविण्याच्या भानगडीत न पडता मी फोटो काढला. आमच्या नात्याची हीच तर कमाल आहे की we keep the other party guessing. म्हणूनच आमचा प्रेम विवाह एवड्या वर्षांनी अजून टिकून आहे. 🙂 🙂
——————————
रंग बदलणारा सरडा. !!!!पण मग माणसांचे काय? माणसे रंग बदलत नाहीत? देवाने दिलेला शारीरिक रंग बदलण्यासाठी तर जंग जंग पछाडले जाते. कर्तृत्वाचे रंग तर बदलत असतात!!! मनाच्या रंगाची काही वेगळी गोष्ट नाही.

सरडा निदान जीव वाचविण्यासाठी तरी रंग बदलतो. पण माणूस !!! स्वार्थासाठी कधीही रंग बदलले जातात. मला प्रश्न पडतो की रंग बदलण्याची कला कोण कोणाकडून शिकले? सरडा माणसाकडून की माणूस सरड्याकडून. 🙂
—————————

प्रेमविवाह:
प्रेम विवाह असो व नसो, लग्नानंतर लगेच सर्व मंडळींच्या समोर दोघांनी  मिठी मारणे आपल्या संस्कृतीत बसत नाही असे मला वाटते. हे करण्यासाठी लागणारा बिनधास्तपणा प्रत्येकाकडे नसेलही पण जरी  असला तरी समाजाचे भान ठेवणे आवश्यक आहे असे मला वाटते.

लग्नापूर्वी एकांतात अशी मिठी मारली नसण्याची शक्यता किती? जर थोडे फार शारीरिक  प्रेम केलेले असेल तर एव्हड्या घाईने मिठी मारण्याचे Logic अनाकलनीय आहे.

नवरा – बायकोत किवा प्रेमी युगुलात, प्रेमाची सुरवात शारीरिक प्रेमापासून होते. त्यानंतर एकमेकांच्या गुण -दोषावर प्रेम वगैरे. विवाह हा टेस्ट match सारखा असतो. पण कदाचित आजच्या  पिढीसाठी हि T -२० match असेल. कारण आज दर वर्षी घटस्फोटाचे दावे जेव्हडे निकाली निघतात तेव्हडेच नवीन दावे दाखल होतात. मुंबईत साधारण १०,०००  दावे प्रलंबित असतात असे वाचनात आले होते. असो.

अर्थात एकांतात आणि समाजात कसे वागावे हा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त तुमच्या  वागण्याचा त्रास दुसऱ्याला होता कामा नये. असे बघण्याची सवय नसल्यामुळे ह्या मिठीचा त्रास वयस्कर लोकांना होण्याची शक्यात अश्या  जोडप्याने विचारात घेणे आवश्यक होते.
————————————–

आठवणीतील वस्तू:
मी माणसांवर आणि वस्तूंवर मनापासून प्रेम करतो. ज्या वस्तूंच्या आधाराने  मी मोठा झालो, त्या वस्तूंना मी विसरत नाही. त्यांचे आयुष्य संपेपर्यंत मी त्यांची देखभाल करतो आणि अगदी ना इलाज  झाला की मोडीत काढतो. वस्तू लहान असेल तर जपून ठेवतो. अशा  वस्तू  वर्षातून  एक – दोन वेळा मी बाहेर काढतो आणि स्पर्श करून – त्यांच्या सहवासातील आठवणीत चिंब भिजतो आणि मग परत त्या वस्तू ठेऊन देतो.  त्या वस्तू अजूनही मला त्या जुन्या काळात घेऊन जातात, त्या आठवणी जागवतात. मित्रानो, कदाचित तुम्हाला हा वेडेपणा वाटेल. पण तुम्ही ह्याच्यावर विचार केलात तर तुम्हाला माझे म्हणणे नक्की पटेल. असो.
————————————————–

स्वप्न:

स्वप्नांना पंख लावून कल्पनाविलासाच्या नभात सैर करता  येईल, पण स्वप्न पूर्ततेची ताकद पंखातच असावी लागते, हे विसरून चालणार नाही.

तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी माझ्या मन :पूर्वक शुभेच्छा.
——————

टोल :
आयुष्याच्या वाटचालीत वेगवेगळ्या वळणावर आपण सर्व जण नकळतपणे निरनिराळ्या स्वरुपात टोल  भरत असतो. पण वाहनात बसून टोल  भरायची वेळ आली कि आपला तोल सुटतो. 🙂
——————–
सुखाचा मंत्र :
आपल्याला आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर आपले आयुष्य वेगवेगळ्या कप्प्यात टाकून मार्गक्रमणा केली पाहिजे. एका वेळी एकाच  कप्प्यात लक्ष केंद्रित करता आले पाहिजे. बघा प्रयत्न करून.
———————-
जर प्रत्येक माणसाला सहवेदनेचे महत्व कळले आणि त्याने हि भावना अंमलात आणली, तर जगात सुख -शांती नांदायला वेळ लागणार नाही.
—————————————————————————————-

माणूस शांत आहे कि  नाही हे त्याची देहबोली बघून ठरविता येते. पण अशांत मन फक्त त्या माणसालाच माहित असते. ज्याचे जळते त्यालाच कळते.
——————————————————————————————–
चक्रव्युह:
आयुष्यात अनेक वेळा समस्यांचा चक्रव्युह भेदावा लागतो . पण सगळेच काही अभिमन्यु नसतात.
———————————————-
नकारात्मक विचार:
आयुष्यात अनेक वेळा विनाकारण नकारात्मक विचार येतात. नकारात्मक विचार हे पावसासारखे असतात. आधी शिंतोडे पडतात, मग भूर भूर चालू होते आणि मग कोसळायला सुरवात होते. पाऊस सुरु झाला कि आपण कसे चटकन छत्री उघडतो, तसेच जेव्हा नकारात्मक विचार मनात येऊ लागले कि त्यांना झिडकारा, मनाचा गाभारा सकारात्मक विचारांनी भरा आणि बघा – अनुभवा जादू.
—————————————————
काही माणसे संवेदनाक्षम स्वभावानुसार स्वत:च्या समस्येने किंवा दुसऱ्याच्या समस्येने हळवी होतात. आयुष्यात असे चालत नाही. प्रत्येकाला नशिबानुसार वेगळे दान पडत असते, ह्याचे भान प्रत्येकाला ठेवावे लागते असे मला वाटते. आयुष्यात दु:ख असूच नये असे सुद्धा ह्या माणसांच्या बोलण्यात डोकावते. पण आयुष्य म्हणजे सुख आणि दु:खाचा खेळ असतो. सुखाची मजा दु:ख शिकवते.
————————————–
”Waves are inspiring, Not because they Rise & Fall, But because they Never Fail to Rise Again”
———————————
Life is like an ocean of sand. It will always slip through your fingers and always slip away from you. There will, however be a small part that stays in the palm of your hand. Be thankful for that…
————————————————————————————
कोळ्याच्या जाळ्याप्रमाणेच आपल्या आयुष्यातही मोहाचे अदृश्य जाळे असते. कीटक जेव्हा कोळ्याच्या जाळ्यात अडकतो तेव्हा त्यातून सुटणे खूप कठीण असते. माणसाची सुद्धा ह्याहून वेगळी अवस्था नसते. मोहावर विजय मिळवा. मनाचा संयम आणि निग्रह वाढवा.
———————–
आपल्या आयुष्यात अनेक कठीण वळणे येतात. हि कठीण वळणे कशी पार करायची, हे  झाडाकडून आणि पाण्याकडून शिकण्यासारखे आहे .
———————————
Lovely thing to learn from Water! “Adjust yourself in every situation”. But most importantly, always find out your “own way to flow”.
———————————————-
LOVE means company, protection, care …………& much  more
प्रेम म्हणजे सहवास, सुरक्षा आणि काळजी घेणे …… आणि बरेच काही.
————————————————-
बदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शारीरिक बालपण सर्वांचेच संपते. पण मनातील बालपण आणि निरागसता हरवणार नाही हि काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.
—————————————————
3 pieces of wise advice:

1) Never lose hope before the time

2) Never celebrate before the time

3) Never leave your post before the battle is over

————————————————
आयुष्यात मानसिक शांती हवी असेल तर नाही ऐकायची आणि नाही म्हणण्याची सवय केली पाहिजे .
————————————————
अहंकार हा माणसाचा मोठा शत्रू आहे. अभिमान आणि अहंकार ह्यातील सीमारेषा खूप धुसर आहे. माणसाला अहंकार वाटू लागला कि समोरची व्यक्ती, परिस्थिती आणि वस्तू यांचे आकलन करण्याची शक्ती धुसर होते. निर्णय चुकतात, पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.
———————————————-
बरेच वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते.
———————————————-

Like A Tree we should find a place to grow and branch out.
——————————————–
चेहऱ्या मागील चेहरा हि ओळख जर तुमच्या वर्तनातून लोकांना दिसली तर त्यांचे तुमच्या चेहऱ्याकडे लक्षच जाणार नाही. तुमचा चेहरा कदाचित ते कालांतराने विसरतील, पण तुमचा खरा चेहरा मात्र त्यांच्या मनात कायमचा कोरला जाईल .
——————————————–
आयुष्यात अनेक घटना घडतात. प्रत्येक घटनेचे निरनिराळ्या मापदंडाप्रमाणे विश्लेषण करता येतेच असे नाही, असे माझे मत आणि अनुभव आहे.
————————————————-
आत्महत्येचा विचार मनात येण्याआधी अनेक गोष्टी घडत असतात. वागणुकीत बदल होत असतो. ह्या सूचना (signal ) टिपण्याचे काम पालक , नातेवाईक . गुरुजन ह्यांच्या कडून काही कारणांनी होत नाही. माणसाची अंगभूत प्रवृत्ती लहानपणापासून कळते.  कौतुक करण्याच्या नादात पालक हि गोष्ट -प्रवृत्ती  मान्य करत नाही. लहान मुलगा चित्रात कोणते रंग भरतो, कोणत्या रंगाचे कपडे त्याला आवडतात  ह्या वरून सुद्धा अंदाज येऊ शकतो.  संस्कार- मुलाला खऱ्या अर्थाने ओळखणे हि पालकांची प्राथमिक जबाबदारी आहे हे मुद्दाम नमूद करत आहे. कोणतीही संस्था – शाळा – समुपदेशक हे काम एका मर्यादेपलीकडे करू शकत नाही.

सुधीर वैद्य

२४-१०-२०१४
Advertisements

0 Responses to “३६६) स्पंदने आणि कवडसे – भाग ६”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

November 2014
M T W T F S S
« Oct   Dec »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: