१०४) मेकिंग द कट / डॉ मोहम्मद खाद्रा / अनुवाद डॉ देवदत्त केतकर

104) Making the cut - Photo2946

१०४) मेकिंग द कट / डॉ मोहम्मद खाद्रा / अनुवाद डॉ देवदत्त केतकर / मेहता पब्लिशिंग हाऊस / जून २०११ / रुपये २०० /- पृष्ठे १८२ / अनुभव कथन.

हे पुस्तक म्हणजे एका सर्जनच्या आयुष्यातील थरार आहे. मूळ पुस्तकाचा (२००७) हा मराठी अनुवाद आहे.

दोन शब्द लेखकाबद्दल:

डॉ मोहम्मद खाद्रा ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे सर्जरीचे प्राध्यापक आहेत. सध्या ते ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष आणि सह संस्थापक आहेत. विकसनशील देशातील सर्जन्सना, सुलभ आणि वाजवी शुल्कात पदवी शिक्षण देण्याचे काम हि संस्था करते.

दोन शब्द पुस्तकाबद्दल:

हे पुस्तक म्हणजे लेखकाचे रूढ अर्थाने आत्मचरित्र नाही. हे पुस्तक म्हणजे प्रशिक्षण आणि वैद्यकीय व्यवसायातील अनुभव कथन आहे.

पुस्तकाची विभागणी दोन भागात केली आहे. १) प्रशिक्षण २) वैद्यकीय व्यवसाय

पुस्तकातील नावे बदललेली आहेत. परंतु पुस्तकातील घटना ह्या ना त्या स्वरुपात घडलेल्या आहेत. पुस्तकातील हॉस्पिटल अस्तित्वात नाही, पण ती वास्तू व तेथील वातावरण ज्या अनेक हॉस्पिटलना डॉ भेट देत, त्या अनुभवातून साकारलेले आहे.

ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ प्रत्येक व्याख्यानाची सुरवात एका कवितेने करीत. विद्यार्थांना ह्याचा अर्थ उमगत नसे. मग काही काळाने त्यांच्या लक्षात आले कि कवितेत मानवतेचा अभ्यास असतो आणि मानवतेचा अभ्यास आणि शल्यशास्त्र ह्यांचे अतूट नाते आहे.

पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाच्या आधी एक सुरेख कविता आहे. ती कविता वाचल्यानंतर आपल्याला पुढे काय वाचायला मिळणार आहे ह्याची थोडी कल्पना येते. प्रकरण वाचून झाल्यावर परत एकदा कविता वाचली तर वाचताना अनेक निसटून गेलेले संदर्भ लक्षात येतात.

डॉ म्हातारपणी स्वत:च रोगी म्हणून त्या हॉस्पिटल मध्ये भरती होतात आणि त्यावेळी त्यांची वेदनेशी परत एकदा ओळख होते. सर्जन म्हणून कार्य करताना रुग्णाला किती वेदना होत असेल हा केलेला अंदाज आणि प्रत्यक्षातील भोगलेली वेदना ह्यांची सांगड घालणे खूप कठीण असते ह्याची जाणीव त्यांना होते. रुग्णाच्या दृष्टीकोनातून त्यांना हॉस्पिटल मधील व्यवस्थापनातील उणीवा (जेवणाचा दर्जा , स्वच्छता वगैरे) लक्षात येतात. ह्या उणिवांची ते कारण मीमांसा सुद्धा करतात.

आजारपणातून बरे झाल्यानंतर, ते सर्जन म्हणून निवृत होण्याचे ठरवितात. निवृत्तीचा निर्णय घेणे खूप कठीण असते. उर्वरित आयुष्य विद्यार्थांना प्रशिक्षण देण्यासाठी खर्ची घालायचा निर्णय ते घेतात. हा निरोप समारंभ उर्फ ते प्रकरण आपल्या डोळ्यात अश्रू जमा करून संपते. डॉ नी विद्यार्थांना दिलेला सल्ला खरेतर आपल्या पैकी प्रत्येकाला विचार करण्याजोगा आहे.

डॉ नी दोन सुंदर तत्वे मांडली आहेत. हि तत्वे कोणत्याही व्यावसाईकाला पाळता येतील. १) शस्त्रक्रिया म्हणजे एक शास्त्र, कला आणि धंदा आहे. २) सर्जनला यश मिळण्यासाठी उपलब्धता , सौजन्य आणि क्षमता ह्यांची सांगड घालता आली पाहिजे.

डॉ ना शस्त्रक्रियेचा धंदा करणे प्रशस्त वाटले नाही. त्यामुळे त्यांनी खाजगी वैद्यकीय व्यवसाय सोडून हॉस्पिटल मध्ये नोकरी स्वीकारली. अनेक शोध निबंध लिहिले, संशोधन केले आणि विद्यादानाच्या पवित्र कर्तव्याला प्राधान्य दिले.

प्रत्येक माणसाचा आयुष्यात एकदा तरी डॉ ची मदत लागते. काही माणसाना सर्जनची सुद्धा मदत घ्यावी लागते. पण त्यावेळी माणूस स्वत:च इतका घाबरलेला असतो कि त्यामुळे डॉ ला समजून घेण्याची त्याची मानसिकता नसते आणि ती वेळही नसते.

डॉ च्या चेहऱ्यामागील माणूस कसा असतो ह्याची झलक ह्या पुस्तकातून नक्की मिळते व डॉ चे आयुष्य किती खडतर आहे ह्याची जाणीव आपल्याला होते व आपल्या मनातील वैद्यकीय पेशाबद्दलच्या गैसमजाचे हे पुस्तक निराकरण करते.

पुस्तकाचा Font मोठा आहे. पुस्तक जवळ जवळ एका बैठकीत वाचून पूर्ण होते. ज्या वेळी पुस्तक वाचून संपते, त्यावेळी मनात अनेक भावनांचा कल्लोळ सुरु असतो. शेवटची प्रकरणे मनाला चटका लावून जातात.

हे पुस्तक कोणी वाचावे:

हे पुस्तक प्रत्येक वाचक प्रेमीने वाचायला हरकत नाही. पण ह्य पुस्तकाचा जास्तीत जास्त फायदा हा खालील वाचकांना होऊ शकेल म्हणून हे विवेचन.

शाळेतील विद्यार्थी ज्यांचे मोठेपणी डॉ – सर्जन होण्याचे स्वप्न आहे त्यांना डॉ होण्यासाठी किती श्रम (बौद्धिक , शारीरिक , मानसिक ) करावे लागतात ह्याची कल्पना येईल. हे श्रम करण्याची आपली तयारी आहे का ? हे आपल्याला कसे साध्य करता येईल हे ठरविणे सोपे जाईल.

वैद्यकीय विद्यार्थी ज्यांना सर्जन व्हायचे आहे.

प्रत्येक व्यावसाईक (Professional ), ज्याला आपल्या व्यवसायाची काही मुलतत्वे समजणे गरजेचे असते.

मित्रानो, वेळात वेळ काढून हे पुस्तक वाचा. तुमचा वेळ सार्थकी लागेल ह्याची मी हमी देतो.

​डॉ साहेब आपण ग्रेट आहात. मनापासून सलाम . असे सुंदर पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल मेहता पब्लिशिंग हाऊसचे आभार. डॉ देवदत्त केतकरनी अनुवाद सुरेख केला आहे.

सुधीर वैद्य

०७-०६-२०१४

0 Responses to “१०४) मेकिंग द कट / डॉ मोहम्मद खाद्रा / अनुवाद डॉ देवदत्त केतकर”



  1. Leave a Comment

Leave a comment




Archives

June 2014
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.